Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आरोग्य सेवा देणे ही सर्वांची जबाबदारी ! पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

आदिवासीबहुल जिल्ह्याला सक्षम व तंत्रसुसज्ज 

तीन दिवसीय आरोग्य मंथन शिबिराला उत्साहात सुरुवात


नंदुरबार दि.७ एप्रिल २०२५ (जिमाका) 
आरोग्य हा शासनाच्या विकास धोरणाचा केंद्रबिंदू आहे. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याला सक्षम व तंत्रसुसज्ज आरोग्य सेवा देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. अशा आरोग्य मंथन शिबिरांमुळे आपण आरोग्य विषयक धोरणांना नवसंजीवनी देऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागातील सर्वांनी आपल्या कामात सेवाभाव ठेवून कर्तव्यपरायणतेने काम करणे गरजेचे आहे. त्यातूनच जिल्ह्यातील आरोग्य निर्देशांक सुधारतील आणि जनतेचे जीवन अधिक आरोग्यदायी बनेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. 

ते आज जिल्हा नियोजन भवन मधील सभागृहात आयोजित जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यात 7 एप्रिल 2025 ते 9 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवसीय ‘आरोग्य मंथन शिबिर’ जिल्हा नियोजन भवन, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी कार्यक्रमास माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांताराव सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे तसेच विविध आरोग्य संस्थांचे प्रमुख आणि तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी आदिवासी भागातील आरोग्य विषयांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, “नंदुरबार जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे आरोग्य सेवा पुरवताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरेल.” तसेच, शिबिराच्या शेवटच्या दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याची शपथ घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


या शिबिराचे प्रास्ताविक करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र भिकाजी सोनवणे यांनी सांगितले की, “या मंथन शिबिरात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार असून, गटचर्चा करून त्यावर उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिप्राय घेऊन ठोस निर्णय घेण्याचा उद्देश आहे.

शिबिराच्या प्रारंभी. पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या शिबिरात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती, आगामी योजना, मातृ मृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यासाठीचे प्रयत्न, ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्याचे उपाय, टेलीमेडिसिनसारख्या नवकल्पनांची अंमलबजावणी या विषयांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. 

विविध पथकांनी आरोग्यसेवांवरील कार्यपद्धतींबाबत सादरीकरण केले. तसेच आरोग्य सेवा पोहोचवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर संभाव्य उपायांवर खुले चर्चासत्रही आयोजित करण्यात आले.या गटचर्चांतून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायांची नोंद घेण्यात येणार असून, त्या आधारे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे सशक्तीकरण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Post a Comment

0 Comments