उरण/ प्रतिनिधी
पंढरपूरची विठू माऊली हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत मानले जाते. विठोबा, विठ्ठल,विठुराया,माऊली, पांडुरंग किंवा पंढरीनाथ या नावाने विठ्ठलाला संबोधले जाते. मुख्यता भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात या देवतेला पुजले जाते. सामान्यतः विठ्ठल म्हणजे विष्णूचा एक अवतार कृष्णाचे ही रूप मानले जाते.
पंढरपूर मधील विठ्ठलाचे आता थेट यूके मधील लंडनमध्ये मंदिर उभारले जात आहे. आणि विठ्ठलाच्या या मंदिरासाठी पंढरपूर मधून विठोबाच्या पादुका घेऊन दिंडी निघाली.विठ्ठल नामाचा गजर गळ्यात टाळ घेऊन पंढरपूरहुन लंडन कडे निघालेल्या वारीसाठी विठ्ठलाच्या पादुका विठ्ठल मूर्तीला स्पर्श करून निघाल्यात. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठलाच्या आणलेल्या पादुका तिला स्पर्श करून त्याची विधिवत पूजा करून लंडनवासियांकडे सुपूर्त केल्या. यानंतर हरिनामाच्या जयघोषात विठ्ठल भेटीने या पादुका विठ्ठल स्वरूप होऊन लंडन कडे प्रस्थान केले आहे. या प्रवासासाठी रस्ते मार्गाचा तसेच वाहनाचा उपयोग करून ही दिंडी प्रवास करणार आहे.
१८ एप्रिल रोजी ही दिंडी भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करेल व पुढे चीन रशिया युरोप अशा २२ देशातून ७० दिवसात १८०० किलोमीटर एवढा प्रवास करत कारने या पादुका लंडन येथे पोहोचणार आहेत.त्या ठिकाणी सहा एकर परिसरात विठ्ठल-रुक्मिणींच्या भव्य मंदिराचे काम सुरू झाले आहे.
मूळचे नागपूरकर असलेले पण युकेमध्ये स्थायिक झालेले उद्योजक तुषार गडेकर व अनिल खेडकर यांच्या पुढाकाराने लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर साकारले जात असून अनिल खेडकर हे या पंढरपूर ते लंडन दिंडीचे नेतृत्व करत आहेत. दिंडीतील पादुकांचे मंदिर समितीचे भारतातील समन्वयक मोहन पांडे यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.
अनिल खेडकर यांनी या पंढरपूर ते लंडन वारी मागची संकल्पना स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "श्री विठ्ठलाच्या पादुका ज्या सोनाराने घडवल्या त्यांनीच त्या वारीतील पादुका देखील घडवल्या असून त्या पंढरपुरातील श्री विठ्ठलाच्या स्पर्शाने पुनित झाल्या आहेत. पांडुरंग आणि वारकरी संप्रदायाचा वारसा लंडन येथे पोहोचवण्याचा वारी मागचा उद्देश असून लोकांचा यासाठी उदंड प्रतिसाद लाभत आहे" असे ते म्हणाले.

Post a Comment
0 Comments